मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे; त्या महापालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाला पावसाळ्यात गळती लागली आहे. या गळतीमुळे रुग्णांसह कर्मचारी वर्गाला अतोनात त्रास होत असून, महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. असे असतानाही रुग्णालयाची दुरुस्ती होत नसल्याने स्थानिकांसह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.पूर्व उपनगरातील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, शिवाजीनगर, देवनार आणि माहुल गाव या परिसरातून हजारो रुग्ण दररोज दाखल होत असतात. महत्त्वाचे म्हणजे या परिसरात महापालिकेचे शताब्दी हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. परिणामी रुग्णालयात सातत्याने वर्दळ असते. रुग्णालयाच्या परिसरात मोठी जागा असूनही रुग्णांना येथे योग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांसह नातेवाइकांनी केल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही शताब्दी रुग्णालयातील दुरवस्थेची दखल घेत सातत्याने महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन कोणत्याच तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. इमारतीची डागडुजी करण्यात येत नसल्याने आता पावसाळ्यात शताब्दीला गळती लागली आहे. इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी आत झिरपत असून, रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे गळतीची समस्या केवळ या वर्षीच समोर आलेली नाही तर मागील कित्येक वर्षांपासून या समस्येविरोधात आवाज उठवला जात आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याने समस्या सुटण्याऐवजी गुंता अधिकच वाढत चालला आहे. (प्रतिनिधी)>रेकॉर्ड पावसाच्या पाण्यात भिजलेज्या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईक थांबतात; तेथेही पावसाचे पाणी ठिबकत असल्याने त्रासात भरच पडत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने या समस्येबाबत पालिका प्रशासनासोबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. परंतु तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप अनावर झाला आहे.शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ठिबकते आहे. या कार्यालयात रुग्णालय प्रशासनाच्या अनेक नोंदवह्या, महत्त्वाची कागदपत्रे, कर्मचाऱ्यांचे रेकार्ड बुक यासारखी कागदपत्रे आहेत. आणि ती कागदपत्रे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत.
‘शताब्दी’ला गळती; रुग्णांना ‘ताप’!
By admin | Updated: July 31, 2016 01:41 IST