लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक रोडावल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव चांगलेच कडाडले असून, भेंडी, गवार, हिरवी मिरची आणि घेवड्याच्या भावातदेखील मोठी वाढ झाली. गुरुवारी मार्केट यार्डात रविवारी २ लाख जुड्या कोथिंबिरीची आवक झाली होती. त्यात गुरुवारी ६४ हजार १८९ जुड्यापर्यंत घट झाली. मागणीच्या तुलनेत आवक अगदीच घटल्याने चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीच्या जुडीच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली. कोथिंबिरीला शेकडा ८०० ते २२०० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात एका जुडीचा भाव ३० ते ४० रुपये होता. मेथीचीदेखील केवळ ११ हजार जुड्या आवक झाल्याने त्याच्या भावात जुडीमागे २०० रुपयांनी वाढ झाली. मेथीचा शेकड्याचा भाव १ हजार ते १६०० रुपयांवर गेला होता. शेपूचे शेकड्याचे दर २०० ते सहाशे रुपयांनी वाढून, ते ८०० ते १६०० रुपयांवर पोहोचले होते. कांदापात शंभर जुडीमागे २०० ते ३०० आणि पालक १०० ते दोनशे रुपयांनी महागला. कांदापातीचा शेकडा दर एक हजार ते १८०० आणि पालकचा दर ५०० ते ८०० रुपये होता. किरकोळ बाजारात मेथीची गड्डी २० ते २५, पालक गड्डी २० रुपयांना विकली गेली.किरकोळ भाजीविक्रेते राजाभाऊ कासुर्डे म्हणाले, मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात तुरळक आवक झाल्याने पालेभाज्यांसह काही फळभाज्यादेखील महागल्या आहेत. भेंडीचा किलोमागे ७० ते ८०, गवार ७० ते ८०, हिरवी मिरची १०० ते १२०, दुधी भोपळा ४० ते ५०, फ्लॉवर ५० ते ६० आणि कोबीला ५० ते ६० रुपये भाव मिळाला. भेंडीची १२५ क्विंटल आवक झाली, त्याला दहा किलोमागे दीडशे ते साडेतीनशे रुपयांचा दर मिळाला. भेंडीच्या भावात किलोमागे ५ ते १0 रुपयांनी वाढ झाली आहे. गवारीची १०० क्विंटल आवक झाली. भावातही किलोमागे ५ रु. वाढले असून, त्याचा दहा किलोचा दर २०० ते ४५० रुपये होता. हिरव्या मिरचीची ७९६ क्विंटल आवक झाली असून, त्याच्या दरात किलोमागे तब्बल १० रुपयांनी वाढ झाली. त्यास दहा किलोमागे साडेतीनशे ते ५०० रुपये भाव मिळाला. दुधीभोपळा किलोमागे ५ रुपयांनी महागला असून, त्यास दहा किलोमागे १०० ते २०० रुपये भाव मिळाला.
पालेभाज्या कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 05:00 IST