नागपूर/नाशिक/नगर : नगरमध्ये पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या संशयिताला पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, तर चोरीच्या गुन्ह्यातील कैद्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले़ तसेच नागपूरमध्ये जनरल स्टोअर्सच्या आडून चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे विकणाऱ्यास नागपूर पोलिसांनी अटक केली़ एकूणच या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे़ नागपूरमध्ये तहसील पोलिसांनी बुधवारी रात्री मोमिनपुऱ्यात जनरल स्टोर्सवर छापा टाकत शस्त्रे जप्त केली; तसेच मोहम्मद नईम जैजूल आबेदिन अन्सारी याला अटक केली. १ तलवार, ३१ खंजीर, ८ कुकऱ्या, ४३ चाकू, १४ सुरे आणि ६ गुप्ती ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. अन्सारीने ही शस्त्रे मुंबईहून आणून तो विक्री करीत होता, असे तपासात निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित भगत यांनी सांगितले. नगरमध्ये पुणे रस्त्यावरील बसस्थानक परिसरात पोलिस पथकाला बुधवारी पहाटे चौघेजण संशयितरित्या फिरताना आढळून आले होते़ चौकशीसाठी पोलिसांनी पाठलाग केला मात्र तिघे पळून गेले तर नितीन बाळू ताठे हा हाती लागला होता. पोलीस व्यस्त असल्याचे पाहून सायंकाळी सहाच्या सुमारास नितीनने कोतवाली पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याची शोधाशोध सुरू केली़ तो एका घरातील स्वच्छतागृहात घुसल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढत मारहाण केली होती़ यात तो जखमी झाल्याने त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूला रक्तपुरवठा बंद झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यातच गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. नितीनने भिंतीवरून उडी घेऊन रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता़ त्यामुळेच त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे भिंतीवरून उडी मारल्यानंतर नितीनच्या डोक्याला मागच्या बाजूने कशी जखम झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर नाशिकरोडमध्यवर्ती कारागृहातून शेती कामासाठी नेलेल्या चोरीच्या गुन्ह्णातील कैदी महम्मद इस्माईल इब्रीस हा गुरूवारी दुपारी पळून गेला. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा सुगावा लागला नाही़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे!
By admin | Updated: May 29, 2015 01:51 IST