- राजकुमार जोंधळे, लातूरज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या राळेगण सिद्धी येथील पत्त्यावर पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी देणारा तरुण लातूर जिल्ह्यातील असून ‘लोकमत’ने त्याचे गाव आणि घर गाठले. मात्र तो दहा वर्षांपासून बेपत्ता असून त्याचा धमकीच्या पत्राशी संबंध असेल, असे गावकऱ्यांना वाटत नाही. अण्णांना आलेल्या धमकीपत्रावर ‘महादेव संभाजी पांचाळ, मु़ पो़ दिंडेगाव ता़ जि़ लातूर’ असा पत्ता नमूद करण्यात आला आहे़ योगायोगाने या नावाचा इसम दहा वर्षांपूर्वी दिंडेगाव येथे राहत असल्याचे समोर आले आहे. महादेव, सुतारकीचा धंदा करायचा.‘लोकमत’ चमू शनिवारी थेट दिंडेगाव येथे पोहोचला. योगायोगाने पत्रातील नावाप्रमाणेच महादेव पांचाळ नावाची व्यक्ती १० वर्षांपूर्वी गावात राहत असल्याची माहिती मिळाली. दिंडेगाव त्याची सासरवाडी होती. तो जेथे राहायचा त्या कुटुंबीयांची ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट घेतली. तेव्हा दहा वर्षांपूर्वी त्याने घर सोडल्याचे त्याची पत्नी चंद्रकला यांनी सांगितले. चंद्रकला त्यांची आई, दोन जुळ्या मुली आणि एका मुलासह दिंडेगावात राहतात. महादेव यांचे मूळ गाव गिरवली (ता़ अंबाजोगाई, जि़बीड) आहे.त्यांचे शिक्षण निव्वळ लिहिता वाचता येण्याएवढे झाले आहे. दहा वर्षांपूर्वी ते आम्हाला सोडून गेले. आता ते कुठे राहतात ? हे आम्हाला माहीत नाही, असे त्यांनी सांगितले.पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही दिंडेगाव गाठून त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली़ त्यांनाही हीच माहिती मिळाली. महादेव पांचाळ नामक व्यक्ती हा आमच्या गावचा जावई असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक परम तुकाराम भोसले यांनी दिली़ ते म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी गेलेल्या महादेवला लोक आता विसरलेही होते. परंतु वर्तमानपत्रात नाव वाचल्यानंतर त्याचे स्मरण झाले.
अण्णांना धमकी देणारा लातूरचा
By admin | Updated: August 23, 2015 01:43 IST