शासनाची माहिती : आतापर्यंत १५८ कोटींच्या अनुदानाचे वाटपनागपूर : उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी ‘मिहान’ प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या असून ‘मिहान’ प्रकल्पग्रस्तांना लवकरच भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली.‘मिहान’ व याकरिता आवश्यक असलेल्या दुसऱ्या धावपट्टीचा विकास तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात राजेंद्र मुळक यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली. ‘मिहान’ तसेच दुसऱ्या धावपट्टीचा विकासप्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत आहे. परंतु तो लवकरच मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड किंवा त्याऐवजी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. विकसित भूखंडासाठी ३७८ प्रकल्पग्रस्तांनी विकल्प दिला आहे. तर सानुग्रह अनुदानासाठी १ हजार ११२ प्रकल्पग्रस्तांनी विकल्प दिला आहे. यापैकी ७३८ प्रकल्पग्रस्तांना १५८.०८ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप झाले आहे असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘मिहान’ प्रकल्पग्रस्तांना लवकरच भूखंड वाटप
By admin | Updated: December 11, 2014 00:52 IST