नरेश डोंगरे, नागपूरकैदी पलायन प्रकरणामुळे देशभर चर्चेला आलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात लाखो रुपयांची रोकड दडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. कारागृहातून बाहेर आलेल्या एका कैद्याने लोकमतला सोमवारी ही खळबळजनक माहिती दिली. दरम्यान, तपास पथकांनाही ‘रोकड पुरून ठेवल्याची माहिती मिळाल्याने कारागृहात सोमवारपासून खोदकाम सुरू झाल्याची माहिती आहे.मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहातून बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्यप्रदेश), शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (वय २४, रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादुर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री (वय २४, रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे पाच खतरनाक कैदी पळून गेले. या गंभीर प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटल्यामुळे राज्याची तपास यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलीस, सीआयडी, एसआयडी, एटीएस तसेच कारागृह प्रशासनाकडूनही समांतर पातळीवर तपास केला जात आहे. एसीबीचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोई यांच्या मार्गदर्शनात एक डझन वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूरच्या कारागृहात तपास करीत आहेत. या कारागृहात केवळ मोबाईल, सीमकार्ड आणि बॅटऱ्याच नव्हे तर अमली पदार्थासह मोठ्या प्रमाणात रोकडही लपवून ठेवली असल्याची चर्चा होती. सोमवारी दुपारी कारागृहातून बाहेर पडलेल्या एका कैद्याने त्याला दुजोरा दिला. त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या आतमधील प्रिंटिंग प्रेस, आरामशिन, स्वयंपाक गृह, धान्य भंडार, तसेच अन्य काही भागात ६० ते ७० लाखांची रोकड लपवून ठेवलेली आहे. कारागृहात श्वान पथकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड कारागृहात कशी गोळा झाली आणि ती कशासाठी पुरून ठेवली, असा प्रश्न केला असता अधिकारी जवळपास रोजच कैद्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करतात. एका दिवशी अधिकाऱ्यांकडे २५ ते ३० हजार रुपये गोळा होतात. ही रक्कम आपल्या निवासस्थानी ठेवली आणि चुकून तपास अधिकाऱ्यांनी छापा घातल्यास खेळ संपेल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळे गोळा झालेली रक्कम अधिकारी खास माणसांच्या हाताने कारागृह परिसरात पुरून ठेवतात, असे सूत्र सांगतो.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात लाखोंची रोकड!
By admin | Updated: April 7, 2015 04:19 IST