मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंडळातील पूर्णवेळ कर्मचारी आणि किमान तीन वर्षे सेवा झालेल्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना विमाछत्र मिळणार आहे.मंडळातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. या प्रस्तावासाठी मंडळाचे प्रभारी कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.या योजनेमुळे कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी, २५ वर्षांपर्यंतची दोन मुले, आई आणि वडिलांना किंवा सासू आणि सासरे (महिला कर्मचाऱ्यांसाठी) यांना आता सर्व आजारांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. यात ३ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती आणि ५ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. गंभीर, विद्यमान तसेच जन्मजात आजारांचादेखील या योजनेत समावेश आहे. सामान्य प्रसूतीसाठी ३० हजार रुपये, तर सिझेरियनसाठी ४० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या जन्मजात शिशूलादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यास कोणताही प्रतीक्षा काळ नसल्याने योजना लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी १५ लाख रुपयांचा कॉर्पोरेट बफर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>महिन्याभरात लागू होणार योजनान्यू इंडिया एश्योरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार असून, सुमारे महिन्याभरात योजना सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रती कर्मचारी ४ हजार ७१० रुपये इतका वार्षिक प्रीमियम अपेक्षित आहे. तरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय अर्थसाहाय्य योजनेची रक्कम आता गट विमा योजनेसाठी वळती केली जाईल, अशी माहिती मंडळाने दिली.
कामगार कल्याण कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेला मंजुरी
By admin | Updated: April 8, 2017 03:24 IST