मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची लॉटरी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार मंडळाने हालचाली सुरू केल्या असून, विरार येथील इमारतींचे काम मार्च २०१६पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये येथील घरांचा समावेश करण्यात आला आहे. विजेत्यांना पात्रता निश्चितीनंतर तातडीने घरांचा ताबा दिला जाणार असल्याचे, कोकण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.या वर्षी अंध व अपंग गटासाठी काढण्यात आलेल्या लॉटरीत यशस्वी झालेल्या विजेत्यांकडून कोकण मंडळाने अद्यापपर्यंत पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे मागविलेली नाहीत. लॉटरी लागून सहा महिने लोटले तरी अद्याप विजेते म्हाडाच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लॉटरीतील विजेत्यांची संख्या कमी असल्याने त्यांना पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार नसल्याचे, कोकण मंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी सांगितले. विरार बोळींज येथील घरांचे बांधकाम मार्चमध्ये पूर्ण होणार असल्याने जानेवारी महिन्यात लॉटरी काढण्यात येणार असल्याचेही लहाने म्हणाले.यंदा मुंबईत घरेच नाहीत?म्हाडाने जानेवारी महिन्यात लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबई मंडळाकडे घरेच उपलब्ध नसल्याने यंदा लॉटरीमध्ये मुंबईतील घरांचा समावेश होण्याची शक्यता धूसर झाली आहे. मुंबई मंडळाने बोरीवली येथे आर आर मंडळासाठी उभारलेली सुमारे दीड हजार घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला गृहनिर्माण विभागाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गृहनिर्माण विभागाने बोरीवली येथील घरांची लॉटरी काढण्यास मंजुरी दिल्यास मुंबई मंडळाचीही लॉटरी निघू शकते, असे एका म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले.
कोकण मंडळाची लॉटरी जानेवारीतच
By admin | Updated: September 8, 2015 02:09 IST