मुंबई : कोकणासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेली एसी डबल डेकर ट्रेन पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनालाच दिसेनाशी झाली आहे. एसी डबल डेकर ट्रेनचे काही डबे देखभाल आणि दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील वर्कशॉपमध्ये असल्याचा दावा मध्य रेल्वे करत आहे. मात्र ही ट्रेन आमच्या वर्कशॉपमध्ये नाही, यावर पश्चिम रेल्वे ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेने एसी डबल डेकर ट्रेन सुरू केली. ही ट्रेन गणेशोत्सवात प्रिमियम म्हणून धावल्यानंतर तिला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ही ट्रेन दिवाळीत प्रिमियम म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रवाशांचा थोडा प्रतिसाद मिळाला. मात्र या ट्रेनला न मिळणारा प्रतिसाद आणि त्यांनतर त्याची देखभाल आणि दुरुस्तीचा निर्माण झालेला प्रश्न पाहता ही ट्रेन मध्य रेल्वेने थेट पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही ट्रेन आमच्याकडे नसल्याचे स्पष्टपणे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे. या ट्रेनचे दोन डबे सॅन्डहर्स्ट रोड येथे देखभालीसाठी असून उर्वरित डबे लोअर परेल येथील वर्कशॉपमध्ये असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील सांगत आहेत. परंतु याबाबत पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपुरकर यांना पुन्हा विचारले असता, ही ट्रेन आमच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांना विचारले असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनाच विचारा, असे त्यांनी सांगितले. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीच जागेवर नसल्याने मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही डबे सॅन्डहर्स्ट रोड तर काही लोअर परेल येथील वर्कशॉपमध्ये असल्याचे सांगितले. मात्र याला प. रे.कडून नकार मिळाला.
कोकणची एसी डबल डेकर ट्रेन पश्चिम, मध्य रेल्वेलाच दिसेनाशी झाली !
By admin | Updated: December 19, 2014 04:38 IST