संतोष मिठारी, कोल्हापूरकार्बन डायआॅक्साईड वायू शोषून घेऊन आॅक्सिजनचा (प्राणवायू) पुरवठा करणारा शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा कोल्हापूर शहराचा ‘प्राण’ बनला आहे. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने विद्यापीठातील झाडांच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला. त्यातून विद्यापीठातील १३२१७ झाडांकडून गेल्या तीन वर्षांत सुमारे २४०० टन आॅक्सिजनचे उत्सर्जन, तर, ९१२ टन कार्बन शोषून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाने विद्यापीठाच्या ८५२ एकर क्षेत्रांतील वृक्षगणना आणि संपूर्ण परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमता मापनाचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. यातून १३,२१७ वृक्षांची नोंद करण्यात आली. तसेच त्यांचे जैव-वस्तुमान (बायोमास) काढण्यात आले. शिरीष झाडाचा सर्वाधिक २०३९ टन बायोमास दिसून आला. आॅस्ट्रेलियन बाभूळ (३२२), गिरिपुष्प (२१६), सुबाभूळ (१६०), निलगिरी (१३४) यांचा बायोमास आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण झाडांकडून ९१२ टन कार्बन शोषून घेण्यात आला आहे. तसेच २४०० टन आॅक्सिजनचे उत्सर्जन झाले आहे. वर्षागणिक त्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. शहरातील अन्य परिसराच्या तुलनेत विद्यापीठातील तापमान अर्ध्या ते एक अंशाने कमी दिसून आले.
कोल्हापूरच्या ‘प्राणवायू’ची खाण!
By admin | Updated: June 6, 2016 03:22 IST