- जयंत धुळप, अलिबागकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नागरी क्षेत्रातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १९ नगरपरिषदा निर्मल झाल्या आहेत, तर कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पहिली निर्मल महानगरपालिका होत आहे. त्याची घोषणा येत्या ३० डिसेंबरला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव सुधाकर बोबडे यांनी दिली. ते सोमवारी मंत्रालयात झालेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान परीक्षण समितीच्या बैठकीत बोलत होते. राज्यातील १९ निर्मल नगरपालिकांमध्ये सर्वाधिक आठ नगरपालिका कोकणातील आहेत. त्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, रोहा, महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या नगरपालिकांचा समावेश आहे. उर्वरित निर्मल नगरपालिकांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, मलकापूर, पन्हाळा,भगुर, मोवाड, कुर्डूवाडी व करमाळा यांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘बी’ आणि ‘सी’ हे दोन वॉर्ड ‘निर्मल’ झाले आहेत. हे अभियान २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे, २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत देशभर राबविण्यात येत आहे.
कोल्हापूर होणार ‘निर्मल’ महापालिका
By admin | Updated: November 18, 2015 02:32 IST