कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळील बॉम्बस्फोटप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री मुख्य संशयित आरोपी अविनाश बाबूराव बन (33) त्याची मैत्रीण ज्योती उर्फ प्रीती राजेंद्र पवार (19, जि. सांगली) यांना शिताफीने अटक केली. धक्कादायक म्हणजे अविनाशचे वडील रायगड जिल्ह्यात प्राचार्य तर आई कागल येथे प्राध्यापक आहे.
तिसरा साथीदार संशयित अभय नितीन परीख (रा. शाहूपुरी) हा फरारी आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आणखी चौघा तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही, याची चाचपणी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी मंगळवारी दिली. खब:याद्वारे बॉम्बस्फोटात अविनाश बन याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अविनाशला पुणो येथे राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)