ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
राज्यात भाजपाची सत्ता आली असून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा आला आहे. तसेच, शेतक-यांचे आंदोलन राजकीय होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
किशोर तिवारी यावेळी म्हणाले की, शेतकरी आंदोलनात सुकाणू समितीने केलेल्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर असून शेतक-यांनी सरसरकट कर्जमाफीची गरज नाही. शेतकरी आंदोलन करणारे कोण ? चालवणारे कोण ? त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शेतक-यांचे हे आंदोलन राजकीय पूर्णपणे राजकीय होते, असा दावा त्यांनी केला आहे.
खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या लाटेत निवडणूक आले असून त्यांनी आपल्या संघटनेचा एकही उमेदवार निवडून आणला नाही. जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल करत ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षा दुप्पट शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. शेतकरी नेते मांडवली करतात. तसेच, आपली सोय झाली की विषय सोडून देतात.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची पाठराखण करत त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर सुद्धा आरोप केले आहेत. मुख्यमंत्री थेट गरिबांपर्यंत पोहोचत असल्यामुळे, भाजपाच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना याची भीती वाटत आहे. तसेच, मुख्यमंत्री चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपाच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही, असेही यावेळी किशोर तिवारी म्हणाले.