ऑनलाइन टीम
मुंबई दि. २ - राष्ट्रवादीचे सावतंवाडीतील आमदार दीपक केसरकर यांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला असून ५ ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यापूर्वी त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.
नारायण राणेंचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या दीपक केसरकरांनी गेल्या महिन्यातच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचे जाहीर केले होते, तसेच लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. आपल्या तत्वांशी, स्वाभिमानाशी तडजोड करणे अशक्य असल्याने सिंधुदुर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तींशी लढण्यासाठी आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान केसरकरांनी निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता. तसेच त्यांच्याविरोधात प्रचार करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना आणि नीलेश राणेंना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला असतानाही केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सर्व प्रकारामुळे केसरकर व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला.
५ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार असून तेव्हा त्यांच्या उपस्थितीतीच आपम पक्षात प्रवेश करू असे केसरकरांनी सांगितले. सिंधुदुर्गचा विकास करमे हेच आपले ध्येय होते व यापुढेही आपण त्यासाठीच काम करू असे ते म्हणाले. आपण नेहमीच राड संस्कृतीच्या विरोधात लढा दिला, भविष्यातही आपण असाच लढा देत राहू, असेही त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सावंतवाडीतूनच निवडणूक लढवू असे संकेतही त्यांनी दिले.