ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारदर्शी कारभार हवा असल्याने शिवसेनेबरोबर युती होणार असेल, तर ती सत्तेकरिता नव्हे तर पारदर्शी कारभाराकरिता होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, त्याच वेळी भाजपा कार्यकर्त्याने निवडणूक लढताना समोर शत्रू कोण आहे, त्याचा विचार न करता मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचे आहे, असे सांगत वेळप्रसंगी शिवसेनेबरोबर दोन हात करण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेतही दिले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी येथे संपन्न झाली. समारोपाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीला आपल्याला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. युतीचे काय करायचे, याची चर्चा योग्य ठिकाणी सुरू आहे. अनेक बाबतीत शिवसेनेसोबत भाजपाचे मतभेद असून ही लपून ठेवायची गोष्ट नाही. भाजपाचा आग्रह हा पारदर्शी कारभाराचा आहे. मात्र, तरीही आम्ही युतीचा आग्रह धरत आहोत, कारण अनेक वर्षांनंतर काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला आणण्यात येत आहे. लुटारूंच्या हातून मोदींनी देशाला बाहेर काढले. त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळावे, याकरिता आम्ही युतीचा आग्रह धरत असलो तरी आता युती केवळ सत्तेकरिता होणार नसून किमान समान कार्यक्रमावर केली जाईल. त्या कार्यक्रमातून सामान्य माणसाच्या जीवनात पारदर्शी परिवर्तन होईल.युतीबाबतचा निर्णय पदाधिकारी करतील. मात्र, सैनिकाचे काम हे मैदानात लढण्याचे असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहात. त्यामुळे निवडणुकीत समोर शत्रू कोण आहे, याचा विचार न करता जनतेच्या हिताचे पारदर्शक राज्य निर्माण करण्याकरिता तुम्हाला या वेळीही लढायचे आहे. मोदी नि:स्वार्थी भावनेने २४ तास काम करीत आहेत. आपल्याला त्यांच्याच मार्गाने जायचे आहे. बुथचा कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. त्याला सक्रिय करणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)मोठा निधी चेकने स्वीकारानिवडणूक निधीमध्ये पारदर्शकता यावी, याकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अथवा चेकद्वारे पैसे स्वीकारण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अन्य पक्षांतून येणाऱ्यांना स्वीकारानिवडणुकीत तिकीट कुणाला मिळेल, याची चिंता करू नका, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नेत्याच्या अवतीभवती फिरणाऱ्याला नव्हे तर जनतेच्या भोवती फिरणाऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षात येणाऱ्यांना मोठ्या मनाने स्वीकारा. आपण केवळ ताकद असलेल्या लोकांनाच प्रवेश देत आहोत. पक्षातील जुने व नवे यांना एकत्र लढायचे आहे, असे ते म्हणाले.
दोन हात करण्याची तयारी ठेवा
By admin | Updated: January 13, 2017 04:06 IST