कल्याण : कल्याण-श्रीमलंग रोडवर स्थानिक प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले केडीएमटीचे चालक राजेंद्र खंडू शिंदे यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५१ हजारांची आर्थिक मदत केली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजेंद्र यांची पत्नी शशिकला यांच्याकडे ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.केडीएमटीत १९९७ पासून चालक म्हणून सेवेत असलेल्या शिंदे यांना २८ आॅगस्ट २०१५ ला श्रीमलंग रोडवर कामावर असताना स्थानिक प्रवाशांनी बस न थांबवल्याच्या कारणावरून लाठ्याकाठ्यांनी ंबेदम मारहाण केली होती. त्यात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना सर्वप्रथम उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, प्रकृती गंभीर बनल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय आणि नंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. दरम्यान, वैद्यकीय मदत म्हणून हातभार लावण्याच्या अनुषंगाने गुरुवारी महापौरांच्या दालनात राजेंद्र यांची पत्नी शशिकला यांना ५१ हजारांची मदत देण्यात आली. या वेळी महापौर देवळेकर, उपमहापौर विक्रम तरे, स्थायी समिती सभापती संदीप गायकर आणि सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केडीएमटीच्या ‘त्या’ चालकास साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 03:21 IST