प्रशांत माने,कल्याण- मुंबई महापालिकेत महापौरपदासह अन्य कोणत्याही पदाची किंवा समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने त्याठिकाणी शिवसेनेच्या महापौरांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची उपमहापौरपदाची निवडणूकही होणार असून येथील झालेल्या वाटाघाटीत भाजपाच्या वाट्याला आलेले हे पद त्यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या परिवहन समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला सहकार्य करून युती अभेद्य असल्याचे दाखवले. आता १७ मार्चच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब होईल, यात शंका नाही. नोव्हेंबर २०१५ मध्ये केडीएमसीच्या निवडणुका झाल्या. निवडणूक एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना-भाजपाने निवडणुकीनंतर मात्र युती करत सत्ता स्थापन केली. यावेळी झालेल्या वाटाघाटीत शिवसेनेचे नगरसेवक अधिक असल्याने महापौरपद त्यांच्याकडे गेले, तर उपमहापौरपद भाजपाच्या वाट्याला आले. यात उपमहापौरपदाची माळ भाजपाचे नगरसेवक विक्रम तरे यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, याआधीचे उपमहापौरपद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी राहिलेले आहे. परंतु, निवडणुकीनंतर भाजपाने ते एक वर्षाच्या कालावधीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कालावधी पूर्ण झालेले तरे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. तरे यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौरपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. १७ मार्चला दुपारी २ वाजता निवडणूक होणार असून यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. शनिवार, ११ मार्चला दुपारी ३ ते ५ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. >पारदर्शकतेच्या भूमिकेत राहणार का?मुंबई महापालिकेत कोणतेही पद न भूषवता पारदर्शकतेच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे केडीएमसीतही पदांचा त्याग करून पारदर्शकतेची भूमिका भाजपा बजावणार का, अशीही चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार कृतीउपमहापौरपद भाजपाच्या वाट्याला आले आहे. त्यांनी अर्ज भरला, तर विचार करू, अशी प्रतिक्रिया महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कृती घडेल, असेही ते म्हणाले. कोअर कमिटी निर्णय घेईलपारदर्शकतेच्या मुद्यावर स्थानिक पातळीवरही आम्ही ठाम आहोत. उपमहापौरपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या दोन दिवसांत कोअर कमिटीची बैठक होईल आणि त्यात निर्णय घेतला जाईल, असे भाजपा गटनेते वरुण पाटील यांनी सांगितले. एकमेकांशिवाय गत्यंतर नाही शिक्षण समिती सदस्यांची निवड शुक्रवारी आहे. शिवसेनेकडे ५, भाजपाकडे ४ व अन्य काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. सभापतीपद सेनेकडे असल्याने भाजपाशी कटुता घेणे परवडणारे नाही.
केडीएमसीचे उपमहापौरपद भाजपाकडेच राहणार !
By admin | Updated: March 6, 2017 04:02 IST