मुंबई : डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला शिवसेनेने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे. या मालिकेचे आयोजन म्हणजे मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा सन्मान करण्यासारखे होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे. ज्या दिवशी २६/११च्या स्मृतिदिनी शहीद झालेले जवळपास २०० निरपराध नागरिक व २० पोलिसांचे स्मरण केले जात आहे त्याचदिवशी या मालिका आयोजनासाठी परवानगी दिली जात आहे. ही मालिका आयोजित करण्यासाठी श्रीलंकेची निवड होणे म्हणजे दहशतवादी अजमल आमीर कसाब आणि त्याच्या साथीदारांची पुरस्कारासाठी निवड होण्यासारखे आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याला विरोध होत आहे आणि शिवसैनिकांचाही भारतात सामना खेळण्यास विरोध आहे; परंतु बोर्डात बसलेल्या व्यक्तींना दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांची मुळीच चिंता नाही, असे शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रात म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. काही दिवसांआधी कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासमोर मालिकेला विरोध दर्शविला होता. (वृत्तसंस्था) परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप द्विपक्षीय मालिका खेळण्याच्या निर्णयाला परवानगी दिली नाही ही चांगली गोष्ट आहे आणि सरकारने हा कणखरपणा असाच कायम ठेवावा व सरकारने बीसीसीआयच्या उतावीळांना पायबंद घालायला हवा, असेही शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रात म्हटले आहे.
हा तर कसाबचा ‘सन्मान’च - शिवसेना
By admin | Updated: November 29, 2015 01:31 IST