पद्मश्री पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार - २०१२नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा - २०१२ चे निकाल जाहीर करण्यात येत आहे. पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक विकासात्मक लेखन स्पर्धेचा पहिला पुरस्कार नाशिकचे अॅड. कांतिलाल तातेड यांना त्यांच्या लोकसत्तामधील ‘परकी गुंतवणूक-बेभरवशाची पॉलिसी’ या लेखाबद्दल देण्यात येत आहे. रु. २१,००० रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लेखन स्पर्धेचा दुसरा पुरस्कार पुणे येथील वंदना विजय धर्माधिकारी यांना प्रकाशाकडे नेणारी अर्थसाक्षरता या ‘अर्थपूर्ण’ दिवाळी अंक २०१२ मधील लेखासाठी जाहीर झाला आहे. ११००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तिसरा पुरस्कार लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना ‘एका गावाचे मरण’ या लोकमत गोवा आवृत्तीत प्रकाशित झालेल्या लेखाबद्दल जाहीर झाला आहे. ५००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लोकमत बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचा पहिला पुरस्कार लातूरचे हरी विश्वनाथ मोकाशे यांना ‘एकमत’ दैनिकातील ‘एस.टी. सवलतीसाठी व्याधीग्रस्त वाढले’ या वृत्तासाठी देण्यात येत आहे. रु. २१००० रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार लोकमत नागपूर आवृत्तीच्या सविता देव हरकरे यांना लोकमतमध्ये प्रकाशित ‘ते पंचवीस लाख साप जातात कुठे?’ या वृत्तमालिकेबद्दल देण्यात येत आहे. रु. ११,००० रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तिसरा पुरस्कार केडगाव जि. अहमदनगरचे भालचंद्र रघुनाथ कुळकर्णी यांना ‘पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळातील भ्रष्टाचार’ या लोक टाइम्समधील वृत्तमालिकेबद्दल देण्यात येत आहे. रु. ५००० रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ संपादक ल.त्र्यं. जोशी, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले आणि डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काम पाहिले.
नाशिकचे कांतिलाल तातेड लातूरचे हरी मोकाशे प्रथम पुरस्काराचे मानकरी
By admin | Updated: November 23, 2014 00:34 IST