ऑनलाइन टीम
बेळगाव, दि. २ - सीमाभागामध्ये मराठी विरुद्ध कानडी वाद चिघळला असून कन्नड रक्षण वेदिका या संघटनेचे हजारो कार्यकर्ते येळ्ळूरमध्ये धडक मारण्याच्या इराद्याने बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे बेळगाव व येळ्ळूर या दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी खबरदारी म्हणून वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांना ताब्यात घेतले आहे.
येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र राज्य अशा फलकावरून पेटलेला वाद गंभीर झाला आणि त्यात कानडी पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी लोकांना बेदम मारहाण केल्याने प्रकरण चिघळले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी कानडी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच महाराष्ट्र सरकारने पुरावे सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिवाकर रावते यांना बेळगावला पत्रकार परिषद घेण्यास पोलिसांनी विरोध केला. पत्रकार परिषद रद्द करायला लावली. त्यांना येळ्ळूरमध्ये जाऊ दिले नाही. उलट त्यांना शहराबाहेर काढण्यात आले होते. त्यात भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कन्नडीगांनी मोठा धिंगाणा घातला आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स झळकावून मराठी समाजाला विरोध करण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणाले, की मराठी भाषकांवर होत असलेले हल्ले लगेच थांबायला हवेत. नाहीतर नाक दाबून तोंड उघडावे लागेल. आमचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत असेही कदम यांनी सांगितले.