लातूर : ‘माझे आवडते राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना माझे जीवन संपवून श्रद्धांजली अर्पण करीत आहे. मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे’ अशी चिठ्ठी लिहून लातूर येथील निवृत्त सहाय्यक फौजदार जयराम कांबळे (७२) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.मूळचे निलंगा तालुक्यातील राठोडाचे रहिवासी असलेले जयराम कांबळे २००३ मध्ये पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. ते सध्या शहरातील लेबर कॉलनी येथे कुटुंबासह राहत होते. पत्नी, दोन विवाहित मुले- सुना, नातवंडे आणि चार विवाहित मुली असे त्यांचे कुटुंब. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर कांबळे त्यांच्याबद्दल सर्वांशी खूप भावूक होऊन बोलायचे. सोमवारी सकाळी त्यांचा नातू शिकवणीला जाण्याच्या निमित्ताने लवकर उठला असता, कांबळे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. रात्री त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. कांबळे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर त्यांच्या मनाची संवेदनशीलता सांगतो, असे पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले. कांबळे यांची देहदान करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्याने ही इच्छा अपुरीच राहिली. (प्रतिनिधी)
कलाम यांच्या निधनाने व्यथित निवृत्त फौजदाराची आत्महत्या
By admin | Updated: August 4, 2015 00:58 IST