मुंबई : मराठी व हिंदी नाटकांत विविध भूमिका रंगवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस (७४) यांचे सोमवारी गिरगावातील इंदिरा निवास येथे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.रेखा सबनीस यांची ‘रथचक्र’ या नाटकातली भूमिका विशेष गाजली होती. प्रायोगिक रंगभूमीवरसाठीही त्यांनी योगदान दिले होते. ‘अभिव्यक्ती’ ही स्वत:ची नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली होती. मुंबई मराठी साहित्य संघाचा नाट्यविभाग त्यांनी बराच काळ चालवला. ‘भूमिका’, ‘द स्क्वेअर सर्कल’, ‘पार्टी’ या चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ९ आॅगस्ट १९४७ रोजी त्यांच्या निवासस्थानी युवक बिरादरीची मुहूर्तमेढ रोवली गेली. युवक बिरादरीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत मुंबई जिमखान्याच्या जवळ असलेल्या युवक बिरादरी केंद्रात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ रंगकर्मी रेखा सबनीस यांचे निधन
By admin | Updated: September 27, 2016 00:38 IST