नागपूर : भाजपा नेते संजय जोशी यांच्या समर्थनाचे पोस्टर्स दिल्लीपाठोपाठ नागपुरातही लागले. या पोस्टरच्या माध्यमातून जोशी यांची ‘घरवापसी कधी’, असे प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, ‘मोदी हे माझे नेते’ असल्याचे सांगत त्यांनी या एकूणच वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मध्यप्रदेशातील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी संजय जोशी हे बुधवारी नागपुरात आले. ‘संजय जोशीजी की घर वापसी हो अब की बार’ अशा घोषणाही देण्यात आल्या. संघ कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या भक्कम प्रतिसादामुळे जोशी काही बोलतील असे अपेक्षित होते. मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळत, आपण नागपुरात नेहमीच येत असतो. पोस्टर्सबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, अशी भूमिका घेतली. उलट, मोदी हे आपले नेते असल्याचे सांगत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. मी भाजपचा कार्यकर्ता आहे व कार्यकर्ता राहील, असेही ते म्हणाले. मोदी विरोधामुळे गेली अनेक वर्षे जोशी हे राजकीय विजनवासात आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपमधील एक फळी जोशी यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करीत आहे. (प्रतिनिधी)
जोशी म्हणाले, मोदी हे माझे नेते !
By admin | Updated: April 23, 2015 05:09 IST