नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंड देण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. याअंतर्गत बुधवारी ३५ भूखंडांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या वेळी एकूण ८३,९९0 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचे वाटप इरादीत करण्यात आले.सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको भवन येथे ही सोडत संपन्न झाली. या वेळी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (रायगड) किशन जावळे, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (ठाणे) जगदीश राठोड, व्यवस्थापक कार्मिक आणि औद्योगिक संबंध जेएनपीटी मनीषा जाधव व उपव्यवस्थापक (बंदर नियोजन) राजेश म्हात्रे आदी उपस्थित होते. गावनिहाय संपादित झालेल्या जमिनीच्या बदल्यात साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. जेएनपीटी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संपादित जमिनीचे निवाडे, वारसा हक्क आदींची सखोल पडताळणी केल्यानंतर ३५ पात्रताधारकांचा सोडतीत समावेश करण्यात आला. सोडत काढलेल्या ३५ भूखंडांत २000 चौरस मीटर ते ३६५९ चौरस मीटर क्षेत्रफळांच्या भूखंडांचा समावेश आहे. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या जेएनपीटी नोडमधील सेक्टर २मध्ये हे भूखंड इरादीत करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के भूखंडाची सोडत
By admin | Updated: March 2, 2017 02:45 IST