औरंगाबाद : राज्यातील ‘जिनिंग मिल’ मालकांनी शनिवारी येथे ‘महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशन’ची स्थापना केली. संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून मेसर्स मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक भूपेंद्रसिंग राजपाल यांची निवड करण्यात आली. औरंगाबाद जिमखाना क्लब येथे आयोजित एका बैठकीत जिनिंग मिल मालकांच्या या नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील १०० जिनिंग मिलचे मालक उपस्थित होते. खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन आणि मराठवाडा कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देवडा यांच्यासह जळगाव येथील उद्योजक अरविंद जैन, बीडचे गोपाळ कासट, मलकापूरचे त्रिलोक दांड, परभणीचे ओमप्रकाश डागा, माजी आमदार अण्णासाहेब माने, सेलूचे विजय बिहानी, हिंगणघाटचे जयप्रकाश सारडा, दोंडाईचा येथील ज्ञानेश्वर भामरे, माजलगावचे रामेश्वर तवानी, औरंगाबादचे सुनील अग्रवाल, रासदीपसिंग चावला, गोपाळ अग्रवाल व अजय सोमाणी, कासोडा येथील अनिल सोमाणी, वणीचे विजय गोयंका, मानवतचे गिरीश कतरूवार, चांदूर रेल्वेचे गिरीश जालान आणि खांडव्याचे राजेंद्र जैन यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. राज्यात सध्या साडेसातशे जिनिंग-प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर आहे. कापूस उद्योजकांशी संबंधित तीन विभागीय संघटना (मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ) येथे आधीपासूनच कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)समस्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य -राजपाल‘महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशन’चे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले मेसर्स मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक भूपेंद्रसिंग राजपाल यांना कापूस उद्योगाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘संपूर्ण जिनिंग क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे आपले लक्ष्य असेल. आपण राज्यातील कापूस उद्योगात नवे तंत्रज्ञान, बदलत्या काळानुरूप होत असलेले बदल तसेच नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर कापूस मिल मालकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासही आपले प्राधान्य असेल’ असे ते म्हणाले.
राज्यातील जिनिंग मिलच्या संघटनेची मुहूर्तमेढ
By admin | Updated: August 7, 2016 01:23 IST