मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनधिकृत विद्यापीठातून घेतलेली पदवी बोगस असल्याची माहिती समोर आली असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून तावडे यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. तर आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत ज्ञानेश्वर विद्यापीठाचा आपणास गर्व असल्याचे तावडे यांचे म्हणणे आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर, महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यापाठोपाठ आता शिक्षणमंत्री तावडे यांच्या शैक्षणिक अर्हतेविषयी साशंकता उपस्थित झाल्याने या मंत्र्यांची आणि पर्यायाने त्या-त्या सत्ताधारी पक्षांची ‘नैतिकता’ पणाला लागली आहे.पुणे येथील संत ज्ञानेश्वर विद्यापीठ ट्रस्ट नावाने एक अनधिकृत विद्यापीठ चालविले जात होते. याच विद्यापीठातून तावडे यांनी १९८० ते ८४ या काळात बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी मिळवली. दरम्यान, या विद्यापीठावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कुलपती नेमले गेल्यानंतर त्यांच्या कुलपती पदास आणि विद्यापीठाच्या मान्यतेबाबत दिनेश कामत यांनी न्यायालयात आव्हान दिले. या विद्यापीठाला यूजीसीने मान्यता दिली नसल्याची बाब समोर आल्यानंतर न्यायालयाने या विद्यापीठाची मान्यता रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)
अवैध पदवीने तावडे वादात!
By admin | Updated: June 23, 2015 03:11 IST