‘व्हिजन’ असलेले नेतृत्व: नितीन गडकरीनागपूर : नागपूर परिक्षेत्रातील व्याघ्र प्रकल्पात असलेल्या वाघांच्या संख्येमुळे नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे मोदी यांनी त्यांच्या कामाच्या झपाट्यातून देशवासीयांना एका नवीन ‘टायगर’चा परिचय झाला आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले व त्यांच्या नेतृत्वात विदर्भातील गोरगरीब जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास व्यक्त केला.कस्तूरचंद पार्कवर मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रास्ताविक करताना गडकरी यांनी पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक केले. नागपूरची ओळख करून देताना गडकरी यांनी नागपूरचा इतिहास, संस्कृती , झिरो माईल्स, मिहानसह इतर बाबींचाही आवर्जून उल्लेख केला. नागपूर परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पात ३५० वर वाघ असल्याने देश-विदेशातून पर्यटक नागपूरमार्गे व्याघ्र दर्शनासाठी जातात. त्यामुळे नागपूरला व्याघ्र राजधानी अशी ओळख प्राप्त झाली आहे. मोदी यांच्या कामाच्या झपाट्याने देशाला एका नवीन ‘टायगर’चा परिचय झाला. त्यांच्या रूपाने विकासाची दृष्टी असणारा पंतप्रधान देशाला मिळाला आहे. मानव कल्याणासाठी तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्सचा अवलंब ते करीत आहेत. त्यांना ग्रामीण भागातील मुला-मुलींची, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची, शहरातील पायाभूत सुविधा कशा वाढतील याची चिंता आहे. त्यांच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे आणि पारडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर दळणवळणाच्या सुविधेसह शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. विदर्भात विपुल खनिज, जंगल आहे. या भागातील लोकांना नवीन सरकारकडून विकासाच्या अपेक्षा आहेत, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)
मोदींच्या रूपात देशाला नव्या ‘टायगर’चा परिचय
By admin | Updated: August 22, 2014 01:35 IST