राहुल वाडेकर,
विक्रमगड, दि. 9 - साखरे आश्रमशाळेतील कौशल्या भरसट या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या प्रकरणी यातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार तथा अनुसूचित जमाती कमिटीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांनी दिले असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भरसट कुटुंबीयांची भेट घेतली.
तसेच रोख २५ हजार रुपयांची मदतही केली. यावेळी आश्रमशाळेतील अनेक त्रुटी दूर करून येत्या आमच्या कमिटी दौऱ्यामध्ये या प्रकरणावर ठोस उपाययोजना करण्यासंबंधी पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखरे येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर याच आश्रमशाळेतील तब्बल २० विद्यार्थी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून, यातील १३ डॉक्टरांच्या देखरेखीत तर ७ विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत असून, या विद्यार्थ्यांची पाहणी म्हात्रे यांनी केली. यानंतर भरसट कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी कौशल्याच्या पालकांनी आणि तेथील ग्रामस्थांनीही केली.
यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन रुपेश म्हात्रे यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत जि. प. सदस्य प्रकाश निकम, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाई जाधव, सागर आळ्शी, प्रमोद पाटील, तालुका प्रमुख सुनील पोतदार, अतीश भानुशाली आदी कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.