मुंबई : निलंबनाच्या कारवाईनंतर उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहआयुक्त (प्रशासन) विवेक फणसाळकर ही चौकशी करणार असून, त्यांच्या अहवालावर पारसकर यांच्या विभागीय चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.पारसकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या बलात्कार, विनयभंगाचा गुन्ह्यांचा तपास अहवाल मुंबई पोलिसांनी पोलीस महासंचालक, गृह मंत्रालयाला धाडला. या अहवालानंतर गृह विभागाने पारसकर यांचे निलंबन करावे व विभागीय चौकशी करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला. या प्रस्तावाला काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. निलंबनानंतर विभागीय चौकशीसाठी प्राथमिक चौकशी आवश्यक असते. त्याआधारे आरोपीची विभागीय चौकशी करावी की करू नये हे ठरवले जाते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पारसकर यांच्याविरोधात दाखल मूळ गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असल्याने प्राथमिक चौकशीची जबाबदारी फणसाळकर यांच्यावर सोपविल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. पारसकर यांची प्राथमिक चौकशी सहआयुक्त फणसाळकर करतील, या माहितीस आयुक्त मारिया यांनी दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
सुनील पारसकर यांची चौकशी सुरू
By admin | Updated: August 28, 2014 03:23 IST