नागपूर : सध्या भारताची ‘जुगाड टेक्नॉलॉजी’ चा उपयोग करणारा देश म्हणून जगभरात बदनामी होत आहे. आज जगाचा हा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. यासाठी ज्ञान व विज्ञान क्षेत्रतील बदलासह संशोधनात ‘इनोव्हेशन’ची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी येथे केले.
राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वनराई फाऊंडेशनतर्फे ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूतल व परिवहन मंत्री नितीन गडकरी व नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे उपस्थित होते.
वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व अनंत घारड व्यासपीठावर होते. डॉ़ मोहन धारिया यांनी देश सुजलाम, सुफलाम व हिरवागार करण्यासाठी आयुष्यभर काम केल्याचे माशेलकर म्हणाले. सोबतच यावेळी त्यांनी वनराई फाऊंडेशनकडून पुरस्कार स्वरूपात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम व त्यात स्वत:कडील 5क् हजार रुपये टाकून एकूण दीड लाख रुपयांची रक्कम मुंबई येथील केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटला संशोधन कार्यासाठी भेट देणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी गडकरी म्हणाले, देशातील कृषी व ग्रामीण क्षेत्रत ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची गरज आहे. असे झाल्यास देशात फार मोठी क्रांती व विकास घडून येईल. याशिवाय कमीत कमी किमतीत लोकांना शुद्ध पाणी कसे मिळेल, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)