बेळगाव (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) : आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव भरविण्यास महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.बेळगावमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावती भेट दिली. सकाळी आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभात ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी सायंकाळी संमेलनास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव अद्याप देशात झालेला नाही. हा महोत्सव महाराष्ट्रात भरविण्याच्या दृष्टीने सरकार नियोजन करेल आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. समांतर रंगभूमीच्या विकासासाठी छोट्या-छोट्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले़ मराठी रंगभूमी आशयप्रधान असूनही बंगाली रंगभूमीइतकी चर्चा मराठी नाटकांची होत नाही. मणीपूरमध्येही रतन थिय्याम यांनी नाटक रुजविले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी नाटकातील आशयप्रधानता कायम राखली पाहिजे. रंगभूमीच्या गौरवशाली परंपरेला अनुसरून वाटचाल असावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कसदारपणामुळे मराठी रंगभूमीने ठसा उमटविला असून, मुबंईच्या बृहत विकास आराखड्यात मराठी रंगभूमीला स्थान असावे हे अमिताभ बच्चन यांचे विधान मुख्यमंत्र्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मावळते अध्यक्ष अरुण काकडे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी सुचविलेली संशोधन आणि विकासाची संकल्पना सरकार गांभीर्याने घेईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.प्रायोगिक नाटकांसाठी हक्कांचे थिएटर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करण्याबरोबरच नाट्य संमेलनाचा निधी वेळेच्या आधी उपलब्ध करण्याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी) संयुक्त महाराष्ट्रासाठी घोषणाबाजीमुख्यमंत्री फडणवीस भाषणासाठी माईककडे जात असताना तसेच नाट्य संमेलनाच्या आवारातून मोटारीतून बाहेर जात असताना मराठी गटाने संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.