लोणावळा : पावसाळा १५ दिवसांवर आलेला असताना शहरात इंद्रायणी नदीपात्र आजही जलपर्णीने भरलेले आहे. इंद्रायणी स्वच्छ करण्याचा लोणावळा नगर परिषदेला विसर पडला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्यांमधील एक असलेल्या इंद्रायणीचा उगम लोणावळा शहरात आहे. नदीचे पात्र हे लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने हे नदीपात्र स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही लोणावळा नगर परिषद व पाटबंधारे विभागाची आहे. मात्र, शासनाचे हे दोन्ही विभाग हे त्या संदर्भात काम करण्यात अपयशी ठरले आहेत. दर वर्षी पावसाळापूर्व कामांमध्ये नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे कामाचा समावेश असतो. यंदा मात्र पावसाळा सुरू होण्यास जेमतेम १५ दिवस शिल्लक असताना हे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे नगर परिषदेला नदीपात्र सफाईचा विसर पडला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)या वर्षी पावसाचे सरासरी प्रमाण जास्त असल्याचा अंदाज जर खरा ठरला व पर्जन्यमान वाढले, तर पहिल्याच पावसात लोणावळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीपात्राची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे पसरून परिसर जलमय होईल. याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. नदीपात्राला कन्याशाळेसमोर उद्यानाच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. कैलासनगर स्मशानभूमीच्या बाजूनेदेखील भिंत बांधण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील जलपर्णी व गाळ काढण्यासोबत रेल्वेच्या मोऱ्या नगर परिषदेने साफ कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
इंद्रायणी स्वच्छतेचा विसर
By admin | Updated: May 21, 2016 01:40 IST