मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आपली मुलगी शीनाच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. संजीव खन्ना आणि मी इंद्राणीने दिलेल्या सूचनांचे पालन करत होतो, असे इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले.उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार विशेष न्यायालयाने शुक्रवारी संजीव खन्ना व अन्य आरोपींना रायचा कबुलीजबाब दिला. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचा सीबीआयचा संशय आहे. मात्र ही हत्या आॅगस्ट २०१५मध्ये रायच्या अटकेमुळे उघडकीस आली. रायकडे परवाना नसलेली बंदूक सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. ही बंदूक इंद्राणीनेच दिल्याचा दावा रायने केला आहे.इंद्राणी शीनाच्या छातीवर बसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होती; तर संजीव खन्नाने तिला घट्ट पकडले आणि मी तिचे तोंड दाबले. तरीही शीना माझ्या बोटाला चावली. बोटातून रक्त निघाले. त्यानंतर इंद्राणी शीनाच्या डोक्यावर बसली आणि शीनाचा गळा दाबला, असे रायने नोव्हेंबरमध्ये दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.इंद्राणीची खासगी सचिव काजल शर्माने माझ्या हातात तीन महिन्यांचा पगार आणि एक पार्सल ठेवले. हे पार्सल मी उघडल्यावर त्यात बंदूक होती. ही बंदूक मी दोन वेळा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.तिसऱ्या वेळी बंदूक नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांना बघून मी पळालो. परंतु, पोलिसांनी मला थांबवले आणि माझ्याजवळील बंदूक बघून मला अटक केली, असे रायने १२ पानी कबुलीजबाबात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
इंद्राणीनेच शीनाचा गळा आवळला
By admin | Updated: July 2, 2016 04:35 IST