मुंबई : स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या भारताने हरितक्रांतीनंतर कृषी उत्पादनात स्वयंपूर्णत: मिळविताना आता फळांच्या उत्पादनात जगात दुसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विक्रमी फळ उत्पादनामुळे भारताला हे यश मिळवणे शक्य झाले आहे.राज्यातील पुणे, औरंगाबाद, जळगाव व सांगली हे जिल्हे देशात फळ उत्पादनाच्या नकाशावर झळकले आहेत. केळी उत्पादनात जळगाव जिल्हा देशात अग्रेसर ठरला आहे. फळांच्या वाढत्या उत्पादनामुळे भारतीयांच्या आहारातही त्यांचे प्रमाण वाढत असल्याने लोकांचे आरोग्यमानही सुधारणार आहे. फलोत्पादनात भालीपाल्याच्या तुलनेत फळांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, २०१५मध्ये भारताने फळांच्या उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे. विविध फळांच्या निर्यातीतही भारताने बाजी मारली असून, त्यात द्राक्ष अग्रस्थानी आहेत. २०१४-१५ मध्ये भारतातून १०७.३ हजार टन म्हणजेच १,०८६ कोटींची द्राक्ष निर्यात झाली. त्यानंतर अनुक्रमे केळी आणि आंब्याची निर्यात झाली. चीन व स्पेनपेक्षा प्रतिएकरी कमी उत्पादकता असतानाही भारताने फळांच्या उत्पादनात मोठा टप्पा गाठला आहे. (प्रतिनिधी)
फलोत्पादनात भारत दुसरा
By admin | Updated: January 21, 2016 03:38 IST