धरणे आंदोलन : बसपाच्या नेतृत्वात विदर्भवादी संघटना सहभागी नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची इच्छा असल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत विदर्भ राज्य घेऊच असा निर्धार बसपाच्या नेतृत्वात आयोजित धरणे आंदोलनादरम्यान विविध विदर्भवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांनी आपले आश्वासन पाळावे, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बहुजन समाज पार्टी आता मैदानात उतरली आहे. त्याअंतर्गत बसपाने बुधवारी विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन केले. नागपुरात संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये विदर्भ जॉर्इंट अॅक्शन कमिटीसह विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे राष्ट्रीय महासचिव व प्रभारी अॅड. सुरेश माने म्हणाले, बसपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहान राज्यांच्या धोरणाचे समर्थक आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर व नागपूर करारानंतर सुद्धा विदर्भवासियांना असमतोल विकासास तोंड द्यावे लागले आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या ५४ वर्षात विदर्भ विभागाचा विकास योजनांचा अनुशेष दांडेकर समिती, निर्देशांक समिती यांनी वारंवार स्पष्ट करूनही महाराष्ट्र सरकारने काही ठोस पाऊले व भरीव कामगिरी केलेली नाही. तेलंगाना राज्य निर्मितीनंतर विदर्भवासियांची स्वतंत्र विदर्भ राज्याची तीव्र भावना लक्षात घेऊन बसपा विदर्भाच्या आंदोलनात पूर्ण तयारीनिशी उतरली आहे. तेव्हा विदर्भवादी अस्मितेचा पुरस्कार करीत शेतकरी, युवा व विविध समाज घटकांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय विकासासाठी स्वतंत्र विदर्भाची भूमिका स्वीकारणाऱ्या राजकीय पक्षांना विदर्भ जनतेने न्याय द्यावा. तसेच विदर्भ विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवावी,असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, किशोर गजभिये, डॉ. उदय बोधनकर यांच्यासह बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, भाऊसाहेब गोंडाणे, उत्तम शेवडे सागर डबरासे, विश्वास राऊत, विवेक हाडके, प्रफुल्ल माणके, नागोराव जयकर, विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी अहमद कादर, श्रीनिवास खांदेवाले, दिपेन अग्रवाल, दीपक निलावार, प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. नैना धवड, तन्हा नागपुरी, श्याम वाघ, अरुण केदार, गणेश शर्मा, अॅड. नंदा पराते, ज्ञानेश्वर रक्षक, पृथ्वी गोटे आदींसह बसपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भ राज्याचा हुंकार
By admin | Updated: July 31, 2014 01:08 IST