सुभाष कदम - चिपळूण -जनशताब्दी व राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्यांना डबे वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. पैकी दादर - सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसला १४ऐवजी १७ डबे कायमस्वरुपी करण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरेश प्रभू यांच्यासारखा अभ्यासू रेल्वेमंत्री कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळणार आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, नवीन गाड्या सुरु करण्याबाबत नागरिकांची मागणी आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी शोभेची ठरली आहे. रेल्वेमुळे कोकणचा विकास किंवा पर्यटनवृद्धी झाली नाही. कोकणात येणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचे डब्बे वाढविण्याची घोषणा २० महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. तिची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. आता जनशताब्दी एक्स्प्रेसला ५ जनरल कोच लावावे किंवा ३ सेमी असे १८ डबे जोडण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे नाराजी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, या हेतूने गणपती स्पेशल म्हणून १० दिवस रत्नागिरी-वसईरोड ही गाडी सुरु करण्यात आली होती. ही गाडी दररोज किंवा ३ दिवसांनी सुरु करावी, अशी मागणी आहे.रत्नागिरी ते वसईसाठी सकाळी ५ वाजता ती सुटेल, तर वसई रोडवरुन रत्नागिरीसाठी रात्री ९ वाजता निघेल. नव्याने सुरु होणाऱ्या थिरुअनंतरपूरम - निजामुद्दिन या नव्या एक्स्प्रेससह इतर १५ एक्स्प्रेसला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. चिपळूण - कऱ्हाड हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वेमार्ग सुरु झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. शिवाय अनेक गाड्या कऱ्हाडमार्गे पुणेकडे जातील. या मार्गाचा विचार रेल्वे अर्थसंकल्पात झालेला नाही. परंतु, आता रेल्वेमंत्री प्रभू हे या मार्गाबाबत ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. कोकणासाठी मंत्री प्रभू हे झुकते माप देतील, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी-पुणे रत्नागिरी वसईरोड दररोज, तर अजमेर - मडगाव, पनवेल बंगलोर या दोन दिवसांनी गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी आहे. आता या मागण्याही कधी पूर्ण होतात, याकडे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.कोकण रेल्वेच्या विविध समस्यांबाबत गेले ५ वर्ष पत्रव्यवहार करुनही रेल्वे मंत्रालय दाद देत नाही. आतापर्यंत ५ वर्षात ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी, मुकूल रॉय, सी.पी.जोशी, पवनकुमार बन्सल, मल्लिकार्जुन खर्गे, डी.व्ही. सदानंद गौडा हे मंत्री होवून गेले तर आता सुरेश प्रभू आरुढ आहेत. ५ वर्षात ८ मंत्री या खात्याने पाहिले. परंतु, कोकणवासियांना यांनी न्याय दिला नाही. आता प्रभू मंत्री झाल्याने ते आपल्या भागाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे.सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासियांमध्ये उत्साह.जनशताब्दी एक्स्प्रेसचेही डबे वाढवावेत.हॉलिडे एक्स्प्रेस नियमित करावी.थिरुवअनंतपूरम-निजामुद्दिन एक्स्प्रेससहीत १५ एक्स्प्रेस चिपळूण येथे थांबवाव्यात.चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग सुरु करावा.रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-वसईरोड दररोज, तर अजमेर-सतलाम मडगाव तीन दिवसाने, पनवेल-मडगाव बंगलोर दोन दिवसाने सुरु करावी.५ वर्षात ८ रेल्वेमंत्री झाले .परंतु, पत्रव्यवहार करणाऱ्या नागरिकांना न्याय नाही.
‘राज्यराणी’चे डबे वाढल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या
By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST