मुंबई : कौटुंबिक पार्श्वभूमी, वय, लठ्ठपणा अशा कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे. ४० ते ५० वयोगटातील महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांपैकी ४ टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग असतो, असे इंडियन जरनल आॅफ कॅन्सरमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर, ५पैकी एका महिलेला गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे, असे मेट्रोपोलीस हेल्थकेअरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.२०१३ आणि २०१४ या दोन वर्षांत एकूण ३६ हजार ५१५ महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ७ हजार ९४५ महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका दिसून आला. ४० ते ५० वयोगटातील १० हजार ७८ महिलांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी १ हजार ८५३ महिलांना धोका असल्याचे आढळून आले होते. तर ३० ते ४० वयोगटातील ८ हजार १९६ महिलांची तपासणी करण्यात आली असून, १ हजार ६८८ महिलांना धोका असल्याचे आढळून आले. ५० ते ६० वयोगटातील ५ हजार ९२८ महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ३८४ महिलांना धोका असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. ज्या महिलांची पहिली गर्भधारणा ३५ वय ओलांडल्यावर झाली किंवा ज्यांना गर्भधारणा पूर्ण झाली नाही अशांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. स्तनपान दिल्याने हा धोका टाळता येऊ शकतो, असे डॉ. दीपक संघवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गर्भाशयाच्या कर्करोगाचा वाढता धोका
By admin | Updated: May 9, 2015 01:23 IST