कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरत असल्याचा आरोप करत मंगळवारी पुकारण्यात आलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकाने, रिक्षा, केएमटी व एसटी बस वाहतूक आंदोलकांनी अक्षरश: सक्तीने बंद पाडली. सायंकाळनंतरही शहरातील सर्व व्यवहार बंदच होते. बंदच्या दरम्यान, शिवसैनिकांसह महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बंदमुळे बाहेरगावाहून आलेल्यांचे मोठे हाल झाले. परंतु कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.टोल विरोधातील आंदोलन आक्रमक झाल्याने हसन मुश्रीफ व सतेज पाटील या दोन्ही मंत्र्यांनी टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीच निर्णय घ्यायला तयार नाहीत, असा आक्षेप आंदोलकांनी घेतला. मंगळवारी मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याने सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने बंदचे आवाहन केले होते. (प्रतिनिधी)
कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त बंद
By admin | Updated: August 27, 2014 04:12 IST