कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीच्या चार पथकांनी सोमवारी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (४८) याच्या पनवेल येथील निवासस्थानी तसेच सनातन आश्रमावर छापे टाकले. सकाळी अकराच्या सुमारास सुरू झालेले हे झडतीसत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. पानसरे हत्येप्रकरणी तावडेला सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शुक्रवारपासून तावडेकडे चौकशी सुरू आहे. कसबा बावडा पोलीस लाईन येथील बॉम्बशोध पथकाच्या कक्षाशेजारील बरॅकमध्ये दिवसभर ठेवल्यानंतर रात्री राजारामपुरीच्या कोठडीत त्याची रवानगी केली जाते. गेल्या दोन दिवसांच्या चौकशीमध्ये विचारलेल्या प्रश्नांना बगल देत त्याने तपासकामात असहकार्य केले.रविवारी रात्री चार पथके त्याला पनवेलला घेऊन गेली. त्याचे वास्तव्या असलेल्या पनवेल-पाली-सुखापूर येथील संकुलावर छापे टाकले. यापूर्वी सीबीआयने १ जून रोजी न्यायालयाच्या परवानगीने पनवेल येथील डॉ. तावडेच्या घरी छापा टाकला होता. यावेळी सीबीआय यंत्रणेच्या हाती डायरी, नोटबुक, दोन फोन व त्यांचे कव्हर या व्यतिरिक्त काही लागले नाही. त्यानंतर एसआयटीने हा छापा टाकला आहे. (प्रतिनिधी) >मडगाव आश्रमावरही टाकणार छापा? तावडे हा मडगाव-गोवा येथे २००९मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे यांच्या संपर्कात असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तो तेथील आश्रमामध्येही काही काळ वास्तव्यास होता. त्यामुळे त्या आश्रमावरही छापा टाकला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
तावडेच्या पनवेल येथील संकुलावर छापे
By admin | Updated: September 6, 2016 04:20 IST