सासवड : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील ओढ्यात अनेक दिवसांपासून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. रात्रंदिवस वाळू, मुरूम आणि माती विनापरवाना उपसले जात आहे. शासनाच्या गौण खनिजाबरोबरच पर्यावरणाची हानी या उत्खननामुळे होत असल्याने वाळूउपसा तातडीने बंद करून वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नायगावचे माजी सरपंच दत्तात्रय कड यांनी तहसीलदार पुरंदर व ग्रामपंचायत नायगाव यांच्या कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. नायगावमध्ये वाळू, माती आणि मुरूम विनापरवाना उपसण्याचा प्रकार राजरोस सुरू आहे. वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरींनी तळ घाटला असल्याने वाड्यावस्त्यांतील नागरिक व प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच, वाळू वाहतुकीच्या गाड्यांमुळे गावातील तसेच वाड्यावस्त्यांवरील डांबरी रस्त्याचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
नायगावला अवैध वाळूउपसा
By admin | Updated: April 30, 2016 00:54 IST