ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - कॅबिनेट मंत्र्याने क्लास वन महिला अधिका-याशी गैरवर्तन करणे हा गंभीर प्रकार आहे. असे घडले असेल तर, नारायण राणे तुम्ही ते तातडीने नजरेस आणून दिले पाहिजे होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत कोपर्डी बलात्कार घटनेवर चर्चेला उत्तर देताना सांगितले.
कोपर्डी येथील बलात्कार व खूनप्रकरणी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये चर्चेदरम्यान राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्याच एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अत्यंत वाईट वर्तन केले आहे.
या घटनेची तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्याने दुसऱ्या एका कॅबिनेट मंत्र्यांकडे करून, संबंधितांना समज द्या, अन्यथा यापुढे मी त्यांच्याकडे जाणार नाही, असे महिलेने सांगितल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. कोपर्डी बलात्कार प्रकरणी विधानपरिषदेत बोलताना फडणवीस यांनी या आरोपाला उत्तर दिले.
कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घुण हत्या करण्यात आली होती. मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत या चर्चेला उत्तर दिले होते.