ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शिवसेनेचं श्रद्धास्थान मातोश्री ज्या मतदारसंघात येतं त्या वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे उभं राहणार असल्याचं स्पष्ट झालं असून एक ते दोन दिवसांत काँग्रेस पक्ष अधिकृत घोषणा करेल असं खुद्द नारायण राणे यांनीच सांगितलं आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नसल्याचं राणे यांनी म्हटलं असून येथून निवडणूक लढवण्याचा माझा विचार मी पक्षाला कळवला असल्याचंही राणे यांनी सांगितलं आहे. यावर एक ते दोन दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होईल असं सांगताना राणे म्हणाले की, या मतदारसंघातले सगळे लोक मला व माझ्या कार्यशैलीला ओळखतात त्यामुळे निवडणुकीची तयारी करायला आपल्याला पाच दिवस देखील पुरेसे आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उभं राहण्याची तयारी राणे करत असताना राष्ट्रवादीने आपला उमेदवार देऊ नये यासाठी राणे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. ही निवडणूक शिवसेना आरामाकत जिंकेल असा एकूण कयास असला तरी नारायण राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम न देता आणखी एक कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्याचे आजमावल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराची सगळी धुरा पृथ्वीराज चव्हाण यांनीच वाहिली असली तरी राणे यांना प्रचारप्रमुखाचे पद देण्यात आले होते आणि त्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर राणेंच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राणेंचे राजकीय भवितव्य काय असेल याचा अंदाज या पोटनिवडणुकीत येणार असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.