नातेवाइकांना गावच दिसेना : मारुती मंदिर २५ फूट पुढे सरकलेघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेले माळीण हे एक हसतं खेळतं गाव. गावाला चार वाड्या अणि सुमारे साडेसातशे लोकवस्तीचे गावठाण. बहुतांश आदिवासी समाज. आज सकाळी काही मिनिटांत हे हसतं खेळतं गाव नष्ट झालं. येथील मुख्य व्यवसाय हा भातशेती. त्याचबरोबर पशुपालन आणि बाजूच्या डोंगरातून हिरडा गोळा करण्याचा जोडधंदा येथील ग्रामस्थ करतात. गावात शिक्षणाचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक जण पुणे, मुंबई, मंचर, घोडेगाव, चाकण परिसरात नोकरीस आहेत. लांबलेल्या पावसामुळे गावातील भातशेती धोक्यात आली होती. ग्रामस्थ पावसाची वाट पाहत होते. गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस सुरू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तर पावसाचा जोर अधिक वाढला. मुसळधार पावसामुळेच डोंगराचा महाकाय कडा कोसळला आणि संपूर्ण गावच होत्याचं नव्हतं झालं. रडायलाही कोणी राहिले नाहीदीडशे ते दोनशे जण मृत्युमुखी पडल्याची भीती; मात्र माळीण गावात आक्रोश नव्हता, कारण रडायला कोणी शिल्लकच राहिले नव्हते. संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबेच उद्ध्वस्त झाली. मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. पुण्या-मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक झालेले नातेवाईकच केवळ शिल्लक राहिले आहेत. माळीण गावातील घटनेची माहिती समजल्यावर दुपारनंतर येथील ग्रामस्थांचे नातेवाईक घटनास्थळी येऊ लागले होते. मात्र, त्यांना गावच दिसत नव्हतं. दिसत होता केवळ चिखलाचा मोठा ढीग. एनडीआरएफने सर्व रस्ते बंद केल्याने माळीण गावाजवळ असलेल्या एका शाळेत येथील ग्रामस्थांचे नातेवाईक आक्रोश करीत होते. एखादा मृतदेह सापडला, की आपला कोणी आहे का? असे पाहत होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे एक वृद्ध गृहस्थ आले. सापडलेल्या मृतदेहात आपला जावई आहे का? हे पाहण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. त्यांनी मृतदेह पाहिला आणि हंबरडा फोडला. कारण सापडलेल्या मृतदेहात त्यांचा जावई होता. महाकाय कड्याबरोबर आलेल्या प्रचंड चिखलाच्या लोंढ्यामुळे गावातील मारुतीचे मंदिर सुमारे २५ फूट पुढे सरकले गेले. सुमारे २० ते २५ फूट उंची असलेल्या या मंदिराच्या कळसाचा काही भाग केवळ चिखलाखाली गाडला गेलेला दिसत होता. या मारुती मंदिराच्या ढिगाऱ्याखालीच २५ ते ३० मुले दबली गेली असावीत, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या मारुती मंदिरात तरुण मंडळाचे बॅन्जो आदी साहित्य होते. त्यामुळे येथे कायमच तरुणांचा राबता असायचा, असे ग्रामस्थांनी सांगितले. माळीण गावाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. संपूर्ण तालुक्यातून आलेल्या रुग्णवाहिका, जेसीबी आणि बघ्यांची गर्दी यामुळे कोंडीत भर पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन कार्यमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदीवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचा ताफा साडेपाच वाजण्याच्या सुमारास अडिवरे गावात पोहोचला. वाहतूक कोंडीमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील चारच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही वाहतूककोंडीमुळे सुमारे चार किलोमीटर पायी जावे लागले. अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी जखमींची विचारपूस केली.माळीण गावातील कार्यकर्ते आणि बाजार समितीचे संचालक सावळेराम लेंभे सकाळी नातीला सोडण्यासाठी माळीण फाट्यावर गेले होते. नातीला सोडून घरी येऊन पत्नीसह चिंचेची वाडीकडे शेतात भातलावणीसाठी निघाले असता रस्त्यातच त्यांना दरड कोसळल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी जाऊन पाहिले असता संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेले होते. या प्रलयातून ते थोडक्यात बचावले.सकाळी लवकर ही घटना घडली, तसेच पाऊस असल्याने ग्रामस्थांनी जनावरांना गोठ्यातून बाहेरच काढले नव्हते. त्यामुळे दरड कोसळल्यावर सर्व जनावरे जागेवरच ढिगाऱ्याखाली गाडली गेली. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारे उपसत असताना एक जीपच सापडली. चिखलामध्ये पूर्ण गाडून गेल्यामुळे मदत पथकाला सुरूवातीला ती दिसली नाही. या जीपमध्ये प्रवासी होते की नाही, याबाबत कोणालाही सांगता आले नाही. (वार्ताहर)
काही मिनिटांत झालं होत्याचं नव्हतं
By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST