औरंगाबाद : आॅरिकमधील (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) अँकर प्रोजेक्ट म्हणून गवगवा केलेल्या दक्षिण कोरियाच्या किया मोटार्स कॉर्पाेरेशनच्या ह्युंडाई मोटार्स या कंपनीने महाराष्ट्राऐवजी आंध्र प्रदेशात सात हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. कंपनीच्या वरिष्ठांनी गुरुवारी आंध्र प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ह्युंडाई मोटार्सच्या या निर्णयामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधील पहिल्याच मोठ्या गुंतवणुकीला धक्का बसला असून, मराठवाड्यातील मोठ्या उलाढालीला यानिमित्ताने ब्रेक लागला आहे. जानेवारी २०१७ मध्येच कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याऐवजी आंध्र प्रदेशात उद्योग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तसे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. कंपनीच्या वरिष्ठांनी डीएमआयसीला तसे आज अधिकृतपणे कळविले आहे. ह्युंडाई मोटार्स कंपनीने महाराष्ट्रात यावे, यासाठी राज्याचा उद्योग विभाग पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत होता. स्वत: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोरियाला कंपनीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली होती. परंतु कंपनीच्या उच्च पदस्थांनी आंध्र प्रदेशाकडे गुंतवणुकीचा मोर्चा वळविला. (प्रतिनिधी)
ह्युंडाई मोटार्सचा महाराष्ट्राला ‘टाटा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 02:56 IST