दराटी (उमरखेड) : हैदराबादवरून शस्त्रास्त्रे घेऊन निघालेल्या तीन तरुणांना उमरखेडपर्यंतचीच टीप देण्यात आली होती, तेथून पुढे त्यांना पुसदला नेमके कुणाकडे भेटायचे हे सांगितले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते पोलिसांच्या नाकाबंदीत अडकल्याची माहिती पुढे आली. या आरोपींच्या चौकशीसाठी यवतमाळ पाठोपाठ अकोला येथील दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) दराटीमध्ये शनिवारी दाखल झाले. ३१ डिसेंबरच्या रात्री उमरखेड-किनवट मार्गावरील खरबी चेक पोस्टवर मोहंमद मशियोद्दीन ओवैशी (३५), मोहंदम उमर गाझी (२७) आणि मो.मिबाजोद्दीन निजामोद्दीन (२२) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून पिस्तुल, ६० जिवंत काडतूस, तीन मोबाइल व आंध्र पासिंगची मारुती व्हॅन जप्त करण्यात आली. या आरोपींची एटीएसच्या अकोला व यवतमाळ येथील पथकांनी चौकशी केली. त्या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले, हे अद्याप उघड होऊ शकले नाही.खरबी चेक पोस्टपासून काही अंतरावर थांबून पुढील दिशा मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. तेथून पुढे कुठे जायचे, कुणाला भेटायचे, ही माहिती त्यांना फोनवर सांगितली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच दराटी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे सापडलेल्या शस्त्रास्त्रांचा संबंध वन्यप्राण्यांच्या शिकारीशी की घातपाती कृत्यांशी, याचाही उलगडा पोलीस तपासातून अद्याप होऊ शकलेला नाही. या आरोपींना पाच दिवसांपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर) आरोपींच्या ‘आयटी’वर तपास केंद्रितहैदराबादच्या या तीनही आरोपींचे मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, फेसबुक आयडी व अन्य ‘आयटी’वर एटीएसने तपास केंद्रित केला आहे. प्रथमदर्शनी त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे शिकारीसाठी नसावीत, या निष्कर्षाप्रत एटीएसची यंत्रणा पोहोचल्याचे सांगण्यात येते.
हैदराबादच्या ‘त्या’ तिघांना होती उमरखेडपर्यंतचीच टीप !
By admin | Updated: January 3, 2016 02:27 IST