वरवंड : येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता झाली असल्यामुळे वरवंड येथील बेबी कालव्याला २८ जूनपर्यंत २५ व २६ फाट्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, बेबी कालव्याला पाणी सोडले नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी एक दिवसाचे उपोषण केले. या वेळी लक्ष्मण दिवेकर म्हणाले, की पुणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खडकवासला कालव्याचे पाणी कमी होत चालले आहे. याचा फटका बसला आहे. बेबी कालव्याचे पाणी तीन महिने झाले. दौंड तालुक्यामध्ये आले असूनही वरवंड व कडेठाणपर्यंत पोहोचले नाही. यांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशोक फरगडे म्हणाले, की एक महिना होऊनही बेबी कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या पाटबंधारे विभागाची उदासीनता दिसत आहे. पाटबंधारे विभाग फक्त शहराचा विचार करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.या वेळी रामदास दिवेकर, अंकुश दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, बाळासोा जगताप, वाल्मीक सातपुते, सतीश राऊत, गुणाजी रणधीर, सतीश दिवेकर, नाना शेळके, मनोहर सातपुते उपस्थित होते. सरपंच संजय खडके, उपसरपंच सुनील सातपुते यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या उपोषणाला दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी पाठिंंबा दिला. या वेळी पाटंबधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. गायकवाड व वरवंड शाखेचे वाघारे यांनी आठ दिवसांमध्ये २५ फाट्याला पाणी सोडण्याचे व २६ फाट्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.
पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Updated: June 29, 2016 01:10 IST