तुमसर, (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्णातील तुमसर तालुक्यात एका बंद घरातून जमिनीत पुरलेली मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे तीन महिन्यांपासून ते घर बंद आहे आणि घरमालक काशीराम एक वर्षापासून बेपत्ता. मात्र काशीरामच्या बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार पोलिसांत नाही. तीन महिन्यांपर्यंत काशीरामची पत्नी तेथेच राहत होती. आता ती रायपूरला आहे. जमिनीतून आढळलेली हाडे एक वर्षापूर्वीची असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्याने ‘ती’ हाडे कुणाची आणि कुठे आहे काशीराम, या दोन प्रश्नांनी पोलिसांच्या डोक्याच्या ताप वाढविला आहे. या प्रकरणाचा उलगडा काशीरामची पत्नीच्या बयाणावरून होणार असल्याने तिला आणण्यासाठी पोलीस पथक रायपूरकडे रवाना झाले आहे. देव्हाडी येथे काशीराम कुकडे याचे तुमसर (रोड) रेल्वे स्थानकाजवळील तलाव परिसरात शेत आहे. त्या शेतातच आठ वर्षापूर्वी त्याने लहानसे घर बांधले होते. या घराजवळ इतर घरे नाहीत. सुमारे वर्षभरापासून काशीराम बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. त्याची पत्नी शीला तेथे राहायची. आता तीन महिन्यांपासून तीही आपल्या मुलीकडे रायपूर (छत्तीसगड) येथे राहते. घर कुलूपबंद स्थितीत आहे. तीन दिवसांपूर्वी हे घर खचल्यामुळे त्याठिकाणी खड्डा पडला. या खड्ड्यातून मोकाट कुत्र्यांनी घरातील कपडे बाहेर काढले. तलाव परिसरात गेलेल्या नागरिकांनी घरात डोकावून पाहिले असता सहा फुटाचा खोदलेला खड्डा मातीने बुजविलेल्या स्थितीत दिसून आला. तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे म्हणाले, काशीरामची पत्नी शीला कुकडे (३६) हिने तीन महिन्यांपूर्वी घर सोडले. दीड महिना ती खैरलांजीला आपल्या भावाकडे होती आणि आता ती रायपूर येथे मुलीकडे आहे. तिच्याशी पोलिसांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असून तिला तुमसरला आणण्यात येईल. वर्षभरापूर्वी काशीराम घरुन अचानक गायब झाला, अशी माहिती काशीरामची सावत्र आई शकुंतला कुकडे (७०) हिने दिली. पत्नी शीलाने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली नाही. ९ मार्च रोजी शीला देव्हाडी येथे एका लग्नासाठी आली असता शकुंतलाने तिला पुन्हा काशीरामबद्दल विचारले. मात्र तो अद्याप बेपत्ता असल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नसून आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल करण्यात यणार आहे.
बंद घरातून आढळली मानवी हाडे
By admin | Updated: May 21, 2014 03:53 IST