अधिवेशनाच्या दुस:या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काँग्रेस-राष्ट्रवादीने गदारोळ करून बंद पाडले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या एकूण कामकाजाविषयी विरोधकांवर राजकारणाचा आरोप केला आहे. त्यांच्याशी झालेली ही बातचीत.
प्रश्न : विरोधकांना आज बहिष्काराची भूमिका का घ्यावी लागली? सरकार घाबरले का?
बापट : मंगळवारी सत्ताधारी पक्षाने ठराव मांडण्याचा दिवस असतो. त्यानुसार आम्ही 293 अन्वये प्रस्ताव दिला होता. तो मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाच्या संदर्भात होता. सरकार चर्चेला तयार होते. आमच्या वतीने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन तासच नाही तर दोन दिवस आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत हे सभागृहात सांगितले होते. मात्र विरोधकांना यावर राजकारण करायचे होते. त्यांना चर्चा नको होती म्हणून त्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि दिवसभराचे काम बंद पाडले.
प्रश्न : पण तुम्ही जाणूनबुजून याच विषयावरचा प्रस्ताव आणला असे वाटत नाही का?
बापट : सत्ताधारी पक्षाला आठवडय़ातून एक दिवस प्रस्ताव मांडण्याची परवानगी असते. त्यासाठी मंगळवार ठरवलेला आहे. आम्ही त्यानुसारच प्रस्ताव मांडला. विरोधकांना यावर चर्चाच करायची होती तर आज पुरवणी मागण्या देखील होत्या. त्यात शेतक:यांना द्यावयाचे पैसे, मदत यावर ते बोलू शकले असते. मात्र त्यांनी ते देखील केले नाही. आधी पॅकेज जाहीर करा नंतर चर्चा करा, अशी त्यांची मागणी होती. चर्चा न करताच पॅकेज जाहीर केले तर मग चर्चा कशाची करायची? पण याचेही उत्तर त्यांच्याकडे नव्हते.
प्रश्न : तुम्हीदेखील प्रस्तावाचा मसुदा करताना मावळत्या सरकारला डिवचले नाही का? तुम्ही सुध्दा तर यात राजकारण आणलेच ना.
बापट : मुळात काल काढलेल्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर दुस:या दिवशीदेखील आम्ही सभागृहाचे कामकाज शेतक:यांसाठी बंद पाडले असे चित्र त्यांना निर्माण करायचे होते. 15 वर्षात या सरकारने जे काही करुन ठेवले आहे त्याचाच तर परिपाक दुष्काळसारख्या प्रश्नात आहे. त्यांनी एवढी वर्षे जे करुन ठेवले ते एक महिन्यात कसे काय दुरुस्त करणार? राजकारणाच्या वेळी जरूर राजकारण करा, मात्र जेथे लोकांच्या भल्याचा विषय आहे तेथे तरी विरोधकांनी राजकारण आणून आजचा महत्त्वाचा दिवस वाया घालवला आहे. सरकारला मात्र यावर राजकारण करायचे नव्हते. न्याय द्यायचा होता. मात्र शेतक:यांच्या दु:खाचे राजकारण विरोधकांनी केले आहे जे अत्यंत चुकीचे आहे.
प्रश्न : उद्या काय होणार की असेच चित्र राहील?
बापट : याचे उत्तर विरोधकांनीच द्यायला हवे. जर त्यांना खरोखरीच शेतक:यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घ्यावा. उद्याही ते आजच्यासारखाच गोंधळ करणार असतील तर मी काय सांगू शकतो. जनता शहाणी आहे यावर आपला विश्वास आहे.