पिंपरी : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी थंड हवेच्या ठिकाणी दौऱ्यावर जात असल्याचा शिवसेनेकडून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निषेध करण्यात आला. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविकेमध्ये बाचाबाची झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘लोकमत’नेही ऐन दुष्काळात थंड हवेच्या ठिकाणी गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सिक्कीम दौऱ्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. महापौर शकुंतला धराडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नव्याने रुजू झालेले आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह ३१ मे रोजी निवृत्त होत असलेले शहर अभियंता एम. टी. कांबळे, कार्यकारी अभियंता दिलीप सोनवणे यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सिक्कीम दौऱ्याचा निषेध करीत चर्चेची मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या स्वागतावर भाषण सुरू केले. शिवसेनेने मागणी करूनही बोलण्याची संधी न देता स्वागताचे भाषण सुरूच ठेवल्याने गोंधळ सुरू झाला. नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. दरम्यान, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या की, राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना सिक्कीम या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन करदात्या पैशांची उधळपट्टी केली आहे. दौऱ्यावर पैसे खर्च करण्याऐवजी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना द्यावे. शहरासह राज्यात ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमान असताना महापालिकेचे पदाधिकारी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे योग्य नाही. दौऱ्यातून काय साध्य झाले, याची माहिती महापौरांनी सभागृहाला द्यावी. उबाळे बोलत असतानाच राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमीम पठाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोघींमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. दौऱ्याबाबत महापौर म्हणाल्या की, दौरे केल्यानंतर वेगवेगळी माहिती मिळते. त्याचा शहराला फायदा होऊ शकतो. महापौरांनी खुलासा केल्यानंतर सभेच्या पुढील कामकाजास सुरुवात झाली. (प्रतिनिधी)
थंड हवेच्या दौऱ्यावर गरम चर्चा
By admin | Updated: May 21, 2016 01:36 IST