लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखाद्या रुग्णावर उपचार सुरू असताना तो दगावल्यास नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण किंवा शिवीगाळ केली जाते. परंतु रुग्णासोबत कोणीही नसताना त्याचे पालक बनून डॉक्टरांनी त्याची शुश्रूषा केल्याचे ऐकल्यावर पटकन विश्वास बसणार नाही. मात्र हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला रुग्णास डॉक्टरांनी जीवदान दिले. खेर्डा येथील अंबुबाई व नवसाजी खंदारे हे पती-पत्नी वसमत तालुक्यातील पोखर्णी येथे शेती कामाकरिता वास्तव्यास आहेत. २६ मे रोजी रात्री १२ च्या रेल्वेने नांदुरामार्गे अंबुबाई यांच्या भाच्याचा विवाहासाठी पती-पत्नी पूर्णा येथून निघाले होते. मात्र नांदुरा रेल्वे स्थानक समजून जुनूना रेल्वे स्थानकावर अंबुबाई यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. पतीने त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचा पाय प्लॅटफॉर्मच्या खाली गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर आदळल्या. त्यांचा पाय रेल्वेच्या पायऱ्यांमध्ये अडकल्याने मोडला. तर रेल्वे अन् त्यात त्यांचे पतीही पुढे गेले. अंबुबार्इंनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ धावून आले. त्यांनी रुग्णवाहिकेस संपर्क साधला.रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. रवी करवंदे यांनी उपचार करत जिल्हा सामान्य रुग्णालयात पहाटे त्यांना दाखल केले. विशेष म्हणजे महिलेसोबत कोणीही नव्हते. डीएमओ डॉ. अग्रवाल व आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी महिलेवर प्राथमिक उपचार केले. सकाळी महिलेची तपासणी केली असता महिलेचा पाय पूर्ण निकामी झाल्याने तो कापल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. लागलीच उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसलाही विचार न करता थेट शस्त्रक्रियेची तयारी केली. शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेचा उजवा पाय काढून टाकण्यात आला. महिलेच्या सांगण्यावरून खर्डा येथील काही नातेवाइकांशी डॉक्टरांनी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. दुपारी दोनच्या सुमारास महिलेचा भाचा तेथे आला. ‘डॉक्टरच झाले माझे मायबाप’ डॉक्टरांनी आईप्रमाणे उपचार केल्यामुळे अंबुबाई यांचे डोळे पाणावले. डॉक्टरच माझे मायबाप झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. डॉ. अजय शिराडकर, डॉ. भगवान पुंडगे, आणि भूलतज्ज्ञ डॉ. एन. आर. पवार यांनी शस्त्रक्रिया केली.डॉक्टरांनी स्वत: केले रक्तदान अंबुबाई यांना रक्ताची नितांत गरज होती. बराच वेळ प्रतीक्षा करूनही रक्त मिळत नसल्याने आपत्कालीन सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी रक्तदान केले.
महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय धावले
By admin | Updated: May 29, 2017 04:16 IST